ब्रिटनधील सोळा वर्षे वयाच्या भारतीय वंशाच्या मुलाने स्तनाच्या कर्करोगाच्या घातक प्रकारावर उपाय शोधून काढला आहे. ट्रिपल निगेटिव्ह प्रकारचा हा कर्करोग सध्या औषधांना दाद देत नाही पण त्याने मात्र त्यावर उपचाराची आशादायक पद्धत दाखवून दिली आहे.

क्रिसतीन निथीयानंदम हा आईवडिलांसमवेत भारतातून ब्रिटनला गेला. तेथे त्याने स्तनाच्या तिप्पट तीव्रतेच्या कर्करोगाला उपचाराच्या पातळीवर आणण्याची कामगिरी केली आहे. अन्यथा या कर्करोगाच्या प्रकारात कुठल्याही औषधांना दाद दिली जात नाही. स्तनाचे अनेक कर्करोग हे एस्ट्रोजने, प्रोजेस्टेरॉन व वाढीच्या रसायनांशी संबंधित असतात. कर्करोगाला या रसायनांचा होणारा पुरवठा तोडणारे टॅमोक्झिफेन हे औषध प्रभावी उपचार ठरते. पण अतिशय विखारी स्वरूपाच्या कर्करोगात या औषधाला दाद देणारे संग्राहकच नसल्याने त्यात शस्त्रक्रिया, प्रारणोपचार , केमोथेरपी हे उपाय उरतात पण त्यात रुग्ण वाचण्याची शक्यता फार कमी असते. ट्रिपल निगेटिव्ह कर्करोगात उपचारांना दाद देणारे संग्राहक किंवा रिसेप्टर्स नसतात, इतर वेळी हे संग्राहक टॅमोक्झिफेन औषधांना दाद देतात पण रिसेप्टर्स नसतील, तर औषधाचा उपयोग होत नाही त्यामुळे कर्करोगाला उपचार पातळीवर आणणे महत्त्वाचे आहे. कर्करोगाला उपचारासाठी कठीण करण्यात आयडी-४ प्रथिनांचा वाटा असतो. त्यामुळे या प्रथिनाला रोखले तर कर्करोगाला उपचार पातळीवर आणणे शक्य आहे. त्यामुळे आपण आयडी-४ प्रथिनाची निर्मिती करणाऱ्या जनुकाला निष्प्रभ करण्याचा मार्ग शोधला आहे, असे त्याने सांगितले. काही स्त्रियांमध्ये ट्रिपल निगेटिव्ह कर्करोग औषधांना दाद देतो पण नंतर परिस्थिती पुन्हा बिघडते. यात कर्करोगाच्या उती या ओळखण्यापलीकडे जातात व वेगाने वाढतात.

पीटेन या कर्करोग गाठींना दाबणाऱ्या जनुकावर त्याने काम केले असून त्यामुळे केमोथेरपीचे उपचार प्रभावी ठरण्यास मदत होते. क्रिसतीन निथीयानंदम याने मांडलेल्या या संकल्पनेसाठी त्याला बिग बँग फेअरमध्ये तरुण संशोधक म्हणून अंतिम फेरीत स्थान मिळाले आहे. गुगल सायन्स फेअरमध्येही त्याला अल्झायमरची चाचणी फार लवकरच्या अवस्थेत करण्यासाठी गौरवण्यात आले होते.