येथून १८५ कि.मी. अंतरावर असलेल्या भारत-तिबेट राष्ट्रीय महामार्गावरील नाथपा येथे प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस २०० मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १८ जण ठार, तर १२ जण जखमी झाले आहेत.
मृतांपैकी १५ जण अपघातात जागीच ठार झाले, तर अन्य तीन जण हॉस्पिटलच्या वाटेवर मरण पावले, असे किन्नौरचे पोलीस अधीक्षक राहुल नाथ यांनी सांगितले. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
रेकोंग पिओ येथून रामपूर येथे जात असताना खासगी बसला अपघात झाला. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश असून अन्य मृतांची ओळख पटविण्यात येत
आहे. बसमध्ये बहुसंख्य स्थानिक असल्याने अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतली आणि आपल्या नातेवाईकांचा शोध सुरू केला.
बस दरीत कोसळून सतलज नदीच्या तीरावर थांबली. बसचे तुकडे झाल्याने त्यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण होत होत्या. दुसऱ्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांत अपघात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.