येथून २५० किलोमीटर अंतरावर गुरुवारी किन्नौर जिल्ह्य़ातील रोहतुंग गावी खासगी बस दरीत कोसळून १८ जण ठार आणि अन्य १४ जण जखमी झाले. या अपघातात १५ जण जागीच ठार झाले तर अन्य तिघेजण रुग्णालयात नेतानाच मरण पावल्याची माहिती किन्नौरचे उपायुक्त डी. डी. शर्मा यांनी दिली.
सांगला खोऱ्यातून निघालेली ही ३५ प्रवाशांची बस कल्पा येथे जात होती. जखमी प्रवाशांवर सिमल्यातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये बसचालक आणि वाहकाचाही समावेश आहे. मृतांपैकी बहुतेक सर्वजण सांगला आणि आसपासच्या गावचेच रहिवासी होते.
दरम्यान, चुल्लिंग-तापरी रस्त्यावर मातीचा मोठा ढिगारा एका मोटारीवर कोसळून त्याखाली दोघेजण जिवंत गाडले गेले.