आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी किमान १८ माओवाद्यांचा खात्मा केला आहे. ओडिशा पोलिस आणि आंध्र प्रदेशच्या ग्रेहाउंट पथकाने आज सकाळी संयुक्तपणे ही कारवाई केली. या चकमकीत दोन पोलीसही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ओडिशातील मलकागिरी येथे माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची गुप्त  माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून तीन एके-४७ रायफल्स, तीन स्वयंचलित रायफल्स आणि काही बंदुका हस्तगत करण्यात आल्या आहेत. या चकमकीत मृत्यूमुखी पडलेल्या माओवाद्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मलाकागिरी येथील जिल्हा मुख्यालयात नेण्यात येणार आहेत. दरम्यान, या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी ओडिशा पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांचा नेता गजरला रवी मारला गेला आहे.