दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात उसळलेल्या शीख विरोधी दंगली म्हणजे भारताच्या एकात्मतेवर घातला गेलेला सर्वात मोठा घाला होता, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मतिथी आणि राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यानिमित्त देशभरात ‘एकता दौड’चे आयोजनही करण्यात आले होते.
सरदार पटेल यांच्या १३९ व्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधानांनी ‘एकता दौड’मध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना हिरवा झेंडा दाखवला. आजवर हा दिवस इंदिरा गांधी यांचा बलिदान दिवस म्हणून साजरा केला जात असे अशी आठवण नमूद करतानाच इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील शीख बांधवांविरोधात उसळलेल्या दंगली दुखदच होत्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. ज्या सरदार पटेलांनी आपले उभे आयुष्य राष्ट्राच्या एकात्मतेसाठी वेचले त्यांच्या जन्मदिनीच देशातल्या आपल्याच बांधवांवर करण्यात आलेले हल्ले अत्यंत दुर्दैवी होते, अशी खंत मोदी यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असे नव्हे तर उभ्या देशाच्या एकात्मतेच्या पाठीतच जणू यामुळे खंजीर खुपसला गेला, त्या धाग्याची वीण उसवली गेली, अशी टीका पंतप्रधानांनी केली. ‘भारताचे पोलादी पुरुष’ अशा शब्दांत ज्यांचा उचित गौरव केला जातो, त्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असले तरीही त्याद्वारे अन्य कोणाही नेत्याच्या योगदानाचे अवमूल्यन करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, असे सरकारने स्पष्ट केले.
शक्तिस्थळावरील कार्यक्रमाला पंतप्रधान अनुपस्थित
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तिस्थळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अनुपस्थित राहिले. मात्र राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. शक्तिस्थळावर भक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी यांनी केलेल्या भाषणांची फीतही या वेळी लावण्यात आली होती. इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाचे स्मृतिस्थळात रूपांतर करण्यात आले असून तेथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमापासून सरकार दूर राहिल्याबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. इंदिरा गांधी यांनी आपले आयुष्य देशासाठी वेचले, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्याची प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे, असे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना शक्तिस्थळावर जाऊन इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली होती. त्यापूर्वी मोदी यांनी, आपण इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशवासीय आणि महिलांसमवेत गांधी यांना आदरांजली वाहत असल्याचे ट्विट केले.