दोन वयोवृद्ध महिला तीन दिवसांपासून आपल्या जुन्या नोटा बदलून मिळाव्यात यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चकरा मारत आहेत. परंतु, त्यांच्या जुन्या नोटा बदलून मिळालेल्या नाहीत. नोटा बदलून दिल्या नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शुक्रवारी नोटा बदलण्याचा अंतिम दिवस आहे.

जुन्या कपड्यांमध्ये आपल्याला ४१,५०० रूपये मिळाल्याची माहिती ६५ वर्षीय उषा यांनी दिली. या नोटा बदलण्यासाठी त्या तीन दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात येत आहोत. पण आमची कोणीच मदत करत नसल्याचे त्या म्हणाल्या. उषा आपली आई सुमित्रा (वय ८०) बरोबर आरबीआयच्या प्रवेशद्वाराजवळ रांगेत उभ्या राहतात. मात्र त्यांना नोटा बदलून दिल्या जात नाहीत. बँकेचे अधिकारी सध्या फक्त अनिवासी भारतीयांच्या नोटा बदलून देत असल्याचे सांगत असल्याचे, त्या म्हणाल्या.
त्यामुळे वैतागलेल्या या मायलेकींनी पोलिसांना पत्र लिहून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या बाहेर रात्रीपासूनच लोक रांगेत उभे आहेत.