छत्तीसगडच्या कोंडगाव जिल्ह्य़ात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका कमांडरसह दोन नक्षलवादी ठार झाले, तर एकाला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. मर्दापल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुधूर गावातील जंगलात सुरक्षा दलाच्या जिल्हा राखीव गटाची आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली, असे बस्तर परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक एसआरपी कल्लुरी यांनी सांगितले. बस्तर विभागातील सुरक्षा रक्षकांना नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी योजना आखण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार आखण्यात आलेल्या योजनेनुसार कारवाई करण्यात आली. पथकात एकूण ३५ अधिकारी- कर्मचारी होते. सदर पथक शोधमोहिमेवरून परतत असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झडली. दरम्यान, बंडखोर नक्षलवादी जयसिंह याला पाठलाग करून पकडण्यात आले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे जतीराम आणि होलधर कश्यप अशी आहेत. त्यांच्याकडून दोन बंदुका आणि देशी बनावटीची एक बंदूक हस्तगत करण्यात आली.