जगात मान्यताप्राप्त असलेल्या मेन्सा बुद्धिमत्ता चाचणीत अडीच वर्षांच्या मुलाचा बुद्धय़ांक १४२ निघाला आहे. मेन्साच्या सिंगापूर येथील शाखेचा तो सर्वात लहान प्रज्ञावान मुलगा आहे. साधारण दोन टक्के लोक बुद्धय़ांकाचा हा आकडा गाठू शकतात. एलिजाह कॅटॅलिग असे या मुलाचे नाव असून तो दोन वर्षे सहा महिने वयाचा आहे. तो कोडी सोडवू शकतो, गोष्टीची पुस्तके वाचू शकतो व साधारण सात वर्षे वयाच्या मुलाला समजतील असे बौद्धिक खेळ खेळू शकतो. गेल्या महिन्यात त्याच्या आईवडिलांनी त्याची चाचणी केली असता त्याचा बुद्धय़ांक १४२ निघाला. त्याला ९९.७ टक्के गुण मिळाले. त्याच्या वयाची केवळ सात मुले सिंगापूर मेन्सा शाखेचा हा सन्मान चार वर्षांत मिळवू शकली आहेत. यापूर्वी दोन वर्षे व दोन महिने वयाच्या मुलाचा बुद्धय़ांक जास्त निघाला होता. साधारण मुलांचा बुद्धय़ांक हा १०० असतो. एलिजाह या मुलाने स्टॅनफोर्डच बिनेट चाचणी दिली असून त्यात तर्क, गणित, चित्रे, कोडी व आकडय़ांचा क्रम यात मुलांची बुद्धिमत्ता तपासली जाते त्यात त्याचा बुद्धय़ांक १४९ निघाला आहे.