पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खानजादा यांच्या हत्येप्रकरणी लष्कर-ए-जांगवीचे (एलईजे) २० दहशतवादी आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या चार पोलिसांना अटक करण्यात आली आहे.लष्कर-ए-जांगवी या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेच्या २० दहशतवाद्यांना शुजा खानजादा हत्येप्रकरणी पंजाब प्रांतातील विविध भागांतून अटक करण्यात आली, असे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
गृहमंत्री खानजादा यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या दहशतवाद्यांबाबतची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले. अटोक जिल्ह्य़ातील शादी खान गावात खानजादा यांच्या निवासस्थानावर आत्मघातकी हल्लेखोराने केलेल्या बॉम्बहल्ल्यात गृहमंत्र्यांसह अन्य १९ जण ठार झाले होते.