हिवाळ्यापूर्वीच भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या इराद्याने किमान १५० ते २०० अतिरेकी हे सीमेपलीकडील छावण्यात दबा धरून बसले असल्याचा गौप्यस्फोट लेफ्टनंट जनरल के.एच सिंग यांनी केला.
 वार्ताहरांना त्यांनी सांगितले, की पीर पांजालच्या दक्षिणेला १५०-२०० अतिरेकी दबा धरून बसले आहेत. साधारण जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर म्हणजे हिवाळ्याच्या आधीच त्यांचा घुसखोरी करण्याचा इरादा आहे.
कारगिल विजय दिवसाला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ते नाग्रोटा येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अतिरेक्यांच्या सारख्या पुढे जाणे व थोडे मागे येणे अशा हालचाली सुरू असतात. त्यामुळे ते केव्हाही घुसखोरी करू शकतात, प्रत्यक्ष ताबा रेषेवर लष्कर सतत लक्ष ठेवत आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर पाकिस्तानने जो गोळीबार केला त्याबाबत त्यांनी सांगितले, की दोन महिन्यांत अखनूर येथे दोन हल्ले झाले व त्याला पुरेसे प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात अनेक अतिरेकी मारले गेले आहेत.या हल्ल्यांमागे पाकिस्तानी लष्कर असण्याच्या शक्यतेबाबत ते म्हणाले, की त्याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. जर पाकिस्तानी लष्कराला परिस्थितीचे गांभीर्य असेल, तर ते अतिरेक्यांना घुसखोरी करू देणार नाहीत.