नरेंद्र मोदी, अमित शहांचा नेत्यांना कानमंत्र; पंधरा वर्षांचे नियोजन करण्याची सूचना

२०१९ मध्येही दिल्लीचे तख्त राखण्यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातची निवडणूक जिंकणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी अधोरेखित केले. त्याच वेळी पुढील पंधरा वर्षांचे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी पक्षनेत्यांना केली.

राज्या-राज्यातील पक्ष चालविणाऱ्या प्रमुख नेत्यांचा सुकाणू समित्यांची (कोअर टीम) दिवसभराची एक प्रदीर्घ बैठक मंगळवारी झाली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली बैठक रात्री नऊ  वाजण्याच्या सुमारास संपली. राज्या-राज्यांतील प्रमुख नेत्यांसमवेत महत्त्वाचे केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय पदाधिकारीही उपस्थित होते. सरकार व पक्ष यांमधील समन्वय वाढविणे, कार्यकर्त्यांना मानाचे पान देणे आणि केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे, या त्रिसूत्रीवर भर देण्याचा सल्ला मोदी, शहांनी दिला.

पुढील वर्षी होत असलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक झाली.

बैठकीच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने संघटनात्मक कामांचा आढावा होता. विधानसभांबरोबर अनेक राज्यांत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरही भर दिला गेला होता.

बैठकीचा प्रारंभ शहा यांच्या भाषणाने झाला. जीएसटीच्या अंमलबजावणीवर भर, केंद्राच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आग्रह आणि कार्यकर्त्यांशी उत्तम समन्वय यावर त्यांचे भाषण बेतले होते. शहांच्या भाषणानंतर पाच सत्रांमध्ये गटागटाने चर्चा करण्यात आली. सामाजिक माध्यमांचा परिणामकारक वापर हा प्रमुख मुद्दा होता. त्याशिवाय सत्ता असलेली राज्ये, विरोधात बसावी लागलेली राज्ये आणि सत्ता येण्याची शक्यता असलेली राज्ये अशा तीन विभागांत चर्चा करण्यात आली.

‘देशहित हेच एकमेव ध्येय’

सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समारोपाचे भाषण झाले. ‘काही मूठभर मंडळी सरकारच्या चांगल्या कामापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवीत आहेत. आपल्या सरकारचे यश विरोधकांच्या डोळ्यात खुपते आहे. कोणीही नावे ठेवली तर देशहित हेच आपले एकमेव ध्येय आहे. त्यापासून नाळ तुटता कामा नये,’ असे मोदी म्हणाले.

सत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काढलेल्या तिरंगा यात्रांनी देशाला एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न झाला, असेही ते म्हणाले.   भाजपशासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची शहांनी २७ ऑगस्टला स्वतंत्र बैठक बोलाविली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची समन्वय बैठक २९ ऑगस्टला होत आहे. त्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सहभागी होणार असल्याचे समजते.

एकनाथ खडसे उपस्थित

महाराष्ट्र भाजपच्या सुकाणू समितीतील प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे , मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार आदी या बैठकीसाठी निमंत्रित होते. एकनाथ खडसे यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित नव्हते. भाजपच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची स्वतंत्र बैठक २७ ऑगस्टला आहे.