वेस्टर्न केन्टकी विद्यापीठामधील ६० पैकी जवळजवळ २५ भारतीय विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रानंतर आपले संगणक विज्ञानाचे शिक्षण अर्धवट सोडून विद्यापीठातून बाहेर पडण्याचा प्रसंग ओढवला आहे. प्रवेशासाठीच्या नियमांची पूर्तता करण्यास हे विद्यार्थी असमर्थ ठरल्याचे कारण विद्यापीठाकडून देण्यात आले. या विद्यार्थ्यांना भारतात परत यावे लागेल अथवा अमेरिकेतील अन्य विद्यापीठांचा शोध घ्यावा लागेल. गेल्या वर्षी उन्हाळ्यात राबविण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील प्रवेश प्रक्रियेदरम्यान या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. शिक्षणासाठीच्या शुल्कात सुट देण्यासारखी प्रलोभनेदेखील त्यांना दाखविण्यात आली होती.
ज्या आंतरराष्ट्रीय एजन्सींची विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी मदत घेतली होती, तिने जाहिरातीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भुरळ घातली. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यापीठातर्फे या एजन्सीला प्रती विद्यार्थी काही रक्कम अदा करण्यात आले होती.
विद्यापीठाने प्रवेशासाठी आखून दिलेल्या मापदंडांची पूर्तता करण्यास जवळजवळ ४० विद्यार्थी अपात्र ठरल्याचे विद्यापीठाच्या संगणक विज्ञान अभ्यासक्रमाचे प्रमुख जेम्स गॅरी यांनी सांगितले. असे असले तरी विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना औपचारिक तत्वावर मदत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांना हाच अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात अली असली तरी जवळजवळ ६० पैकी २५ विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम सोडावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची अनुमती देणे म्हणजे चांगले धन चुकीच्या ठिकाणी लावण्यासारखे होईल, कारण हे विद्यार्थी कॉम्प्युटर प्रोग्रॅम विषयी लिहिण्यास असमर्थ आहेत. जो अभ्यासक्रमाचा महत्वाचा भाग आहे. दरम्यान, वेस्टर्न केन्टकी विद्यापीठाच्या भारतीय विद्यार्थी संघाचे प्रमुख आदित्य शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली.