जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असा गाजावाजा करत ‘रिंगिंग बेल’ या भारतीय कंपनीने गुरूवारी दाखल केलेला ‘फ्रीडम- २५१’ हा स्मार्टफोन पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱयात सापडला आहे. चार ते पाच हजार रुपयांच्या किंमतीचा स्मार्टफोन केवळ २५१ रुपयांत कसा काय विकला जाऊ शकतो? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
१ जीबीची रॅम, ८ जीबीची अंतर्गत मेमरी आणि क्वालकॉमचा १.३ गीगाहर्टझचा क्वाडकोर प्रोसेसर, अशा अत्याधुनिक फिचर्सचा स्मार्टफोन केवळ २५१ रुपयांत बनवणे शक्य नसून रिंगिंग बेल कंपनीने केलेली घोषणा केवळ स्टंटबाजी असल्याचा दावा उद्योग जगतातील काही कंपन्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, ‘फ्रीडम-२५१’ साठी आजपासून सुरू झालेली ऑनलाईन बुकींग सुविधा दिवसभरासाठी बंद पडल्याने या फोनच्या विक्रीबद्दलच्या संशयात आणखी भर पडली आहे. फ्रीडम २५१ च्या खरेदीसाठी उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे संकेतस्थळ क्रॅश झाल्याचा संदेश ‘फ्रीडम २५१’ च्या संकेतस्थळावर झळकत आहे.