चीनमधील गान्सू प्रांतात २६ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या प्राथमिक शिक्षकाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ली जिसून असे या माजी शिक्षकाचे नाव असून त्याला आधी तिआनशुई येथील कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुप्रीम पीपल्स कोर्टानेही शिक्षा कायम केली. ली याने ४ ते ११ वयोगटातील २६ मुलींवर २०११ ते २०१२ दरम्यान बलात्कार केला होता.
शाळेच्या वर्गात किंवा वसतिगृहात त्याने मुलींच्या भोळेपणाचा व भित्रेपणाचा फायदा घेऊन ही कृत्ये केली. समाजावर वाईट परिणाम होत असल्याने ली याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयानेही ती कायम केली. एका व्यक्तीने शाळेच्या वसतिगृहात पाच मुलींवर बलात्कार केला होता, त्याला मृत्युदंडाची  शिक्षा सुनावण्यात आली पण त्याची अंमलबजावणी दोन वर्षे लांबणीवर टाकण्यात आली होती.
या व्यतिरिक्तही इतर तीन प्रकरणांत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. चीनमधील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की मुलांच्या लैंगिक छळाचे प्रकार वाढले असून २०१२ ते २०१४ दरम्यान अशी ७१४५ प्रकरणे समोर आली आहेत.