मुंबईवरील सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झाकी-उर-रहमान लख्वी  पाकिस्तानाच्या तुरुंगात असला तरी मोबाइल, इंटरनेटपासून टीव्ही पाहण्याची सुविधा त्याला दिली जात असून अभ्यागतांनाही त्याला भेटण्याची मुभा देत तुरुंगात ऐषारामी आयुष्य जगतोय.
रावळपिंडीच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या अदिआला तुरुंगात पाकिस्तानचा सर्वात कुख्यात कैदी असूनही लख्वी तुरुंगात ऐषारामात वावरतोय, असे वृत्त ‘बीबीसी उर्दू’ने दिले आहे.  नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार लख्वी असून त्याच्यासोबत या दहशतवादी हल्ला घडविण्यात सहकार्य करणाऱ्या अब्दुल वाजिद, मजहर इक्बाल, हमाद अमीन सादिक, शाहीद जमील रियाज, जमील अहमद आणि युनीस अंजुम अशा आणखी पाच जणांवर आरोप आहे.
गंभीर गुन्हय़ांचे आरोप असूनही लख्वी आणि त्याच्यासोबत मुंबई २६/११ हल्ल्याच्या कटात सामील झालेल्या सर्वाना चक्क तुरुंगाधिकारी कार्यालयाच्या शेजारच्या खोल्या त्यांच्या मागणीवरून देण्यात आल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
टीव्ही संच, मोबाइल फोन आणि इंटरनेट वापरण्याची सुविधा तर तुरुंगाधिकाऱ्याच्या परवानगीनेच देण्यात आली असून दररोज असंख्य लोक येऊन या कैद्यांना भेटण्याची मुभाही देण्यात आली आहे, असे तुरुंगातील काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.
आठवडय़ात कोणताही दिवस असो वा रात्र, कोणत्याही वेळी लख्वीला भेटायला कितीही लोक तुरुंगात येऊ शकतात, असेही तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले. गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ांतील कैद्यांना भेटण्यासाठी ना कुठली विशेष परवानगी घ्यावी लागत अथवा भेटायला येणाऱ्या लोकांनाही त्यांच्या ओळखपत्राची कुठलीही चौकशी न करता लख्वीला भेटू दिले जाते, अशी स्थिती आहे.
वास्तविक ही बाब कोणत्याही अन्य देशांत शक्य नाही; परंतु पाकिस्तानी सरकार अशा अतिरेकी संघटनांच्या कमांडरांना तुरुंगात डांबूनही भविष्यात त्यांचा उपयोग व्हावा या उद्देशाने त्यांना वाट्टेल त्या सुविधा तुरुंगात उपलब्ध करून देतात, असेही तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले.