मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील आरोपी आणि लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या झाकी उर-रहमान लख्वी याला पाकिस्तानाच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने गुरूवारी जामीन मंजूर केला आहे.
मुंबईवरील हल्ल्याच्या प्रकरणाचा निकाल पाकिस्तान न्यायालयात अतिशय संथ गतीने सुरू होता. खटल्याच्या सुनावणीच्या तारखा देखील अनेकवेळा पुढे ढकलण्यात आल्या.  खटल्याच्या सुनावणीबाबतच्या दिरंगाईवर भारतानेही अनेकवेळा पाकवर ताशेरे ओढले आहेत. तसेच भारत सरकारने लख्वीला भारताकडे सोपविण्याची मागणीही लावून धरली होती. परंतु, पाकिस्तान सरकारने ती पूर्ण केली नाही. लख्वीसह अब्दुल वाजीद, मझहर इक्बाल, हमद अमिन सादिक, शाहिद जमैल रिआझ, जमिल अहमद आणि अंजुम यांच्यावर मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखणे, ती अंमलात आणणे आणि त्यासाठी वित्तपुरवठा करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये तब्बल १६६ निष्पापांचा मृत्यू झाला होता.