पारदर्शकतेसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून स्वत:हून माहिती उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये केलेल्या ४४ देशांच्या दौऱ्यांसाठी सुमारे २७५ कोटी रुपयांहून अधिक खर्च आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) बुधवारी जाहीर केली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३१ कोटी रुपयांचा खर्च एप्रिल २०१५मधील फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाच्या दौऱ्यावर झाला.

पारदर्शकतेसाठी काही महत्त्वाच्या बाबींचा तपशील स्वत:हून प्रसिद्ध करण्याची पद्धत ‘पीएमओ’ने सुरू केली आहे. त्यामध्ये पंतप्रधानांसह मंत्र्यांच्या संपत्तीचे तपशील, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवरील खर्च आदींचा समावेश आहे. त्यानुसार मोदींनी गेल्या तीन वर्षांमध्ये २७ परदेश दौरे केले, ४४ देशांना भेटी दिल्या. त्यासाठीचा खर्च २७५ कोटींहून अधिक आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांच्या कारकीर्दीत ७३ दौऱ्यांमध्ये ९६ देशांना भेटी दिल्या होत्या. त्यासाठी सुमारे ७९५ कोटी रुपयांहून अधिक खर्च आला होता. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांचा खर्च केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून केला जातो, तर देशांतर्गत दौऱ्यांचा खर्च संरक्षण मंत्रालयामार्फत केला जातो.

२६ मे २०१४ रोजी शपथ घेतल्यानंतर मोदींनी पहिला परदेश दौरा केला होता तो १५, १६ जून २०१४ रोजी चिमुकल्या भूतानचा. तेव्हापासून मोदींनी भरधाव हवाई उड्डाणे घेतली. एकेकाळी व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेला त्यांनी चार वेळा, तर जपान, नेपाळ, सिंगापूर, फ्रान्स, चीन, उझबेकिस्तान, रशिया आणि अफगाणिस्तानला प्रत्येकी दोनदा भेट दिली. अंटाक्र्टिका खंडवगळता त्यांची पावले सर्व खंडांना लागली आहेत. परदेश दौऱ्यांवरून मोदींना बोचऱ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.