तेलंगणात राजमुंद्री येथे गोदावरी नदीवर सिंहस्थाच्या निमित्ताने आयोजित पुष्कर मेळय़ाच्या वेळी स्नानाच्या मुख्य ठिकाणी म्हणजे पुष्कर घाटावर चेंगराचेंगरी होऊन २९ भाविक ठार झाले, त्यात तेरा महिलांचा समावेश आहे. या घटनेत इतर वीस जण जखमी झाले आहेत. पुष्कर महोत्सवाच्या निमित्ताने पवित्र स्नानासाठी लाखो लोक तेथे जमले होते. दर बारा वर्षांनी राज्यात होणाऱ्या पुष्कर मेळय़ासाठी लाखो लोक येत असतात व पवित्र मुहूर्तावर गोदावरीत डुबकी मारत असतात. सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. त्यात बहुतांश वयोवृद्ध भाविक मरण पावले आहेत. राजमुंद्रीचे उपजिल्हाधिकारी विजय रामाराजू यांनी सांगितले, की मृतदेह राजमुंद्री येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. आतापर्यंत २७ जण ठार झाले असून त्यात बहुतांश वयस्कर महिलांचा समावेश आहे. सकाळपासून भाविक स्नानाची वाट वाहात होते. काही जण प्रवास केल्याने दमलेले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले, की त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे घटनास्थळी होते. त्यांनी पवित्र स्नान केले. त्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून ते व्यक्तिगत पातळीवर लक्ष ठेवून आहेत. नायडू या घटनेने विचलित झालेले दिसत होते त्यांनी सांगितले, की अतिशय दु:खद व धक्कादायक अशी घटना आहे. येथील व्यवस्था पाहण्यासाठी आपण अनेकदा येऊन गेलो होतो, पण काही समस्या तरीही राहिल्या. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये
भरपाई जाहीर केली आहे. वेळ पडली तर पुढील अकरा दिवस आपण राजमुंद्रीत राहू असे त्यांनी सांगितले. कांचीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनीही तेथे आज पवित्र स्नान केले.

भारतातील चेंगराचेंगरीच्या घटना
* ३ फेब्रुवारी १९५४- अलाहाबाद येथे सिंहस्थ कुंभमेळ्यात स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला ५०० भाविक ठार
* २३ नोव्हेंबर १९९४- नागपूर येथे गोवारींच्या मोर्चात चेंगराचेंगरीत ११४ ठार तर ५०० जखमी
* १९९६-उज्जेन व हरिद्वार येथे चेंगराचेंगरीत ३९ भाविक ठार
* ३ जून १९९७ – उपहार सिनेमागृहात आग लागून चेंगराचेंगरीत ५९ ठार
* २७ ऑगस्ट २००३- नाशिक येथे कुंभमेळ्यात अडथळ्यांवर मागे स्नानासाठी रांगेत असलेल्या लोकांचा रेटा येऊन चेंगराचेंगरी झाली. त्यात ३९ भाविक ठार तर १२५ जखमी झाले.
* २५ जानेवारी २००५- सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेव येथे ३४० भाविक दर्शनबारीत गोंधळ होऊन चेंगराचेंगरीत ठार
* ३ ऑगस्ट २००८- हिमाचल प्रदेशात नैनादेवी मंदिरात दरडी कोसळल्याच्या अफवेनंतर चेंगराचेंगरीत १६२ ठार तर ४७ जखमी.
* १० ऑगस्ट २००८- राजस्थानात कोटा येथे महादेव मंदिरातील जिन्यावरून घसरून दोन जणांचा मृत्यू.
* ३० सप्टेंबर २००८- जोधपूरच्या मेहरागड किल्ल्यावर चामुंडा देवी मंदिरातील चेंगराचेंगरीत २२० ठार.
* १० फेब्रुवारी २०११- केरळात साबरीमला येथे डोंगराळ भागात १०२ भाविक ठार
* १० फेब्रुवारी २०१३- अलाहाबाद येथे दोन प्लॅटफॉर्ममध्ये चेंगरून ३६ ठार
* १३ ऑक्टोबर २०१३- मध्य प्रदेशात हिंदू मंदिराकडे जाणाऱ्या पुलावर गर्दीत १०० भाविक ठार
* १४ जुलै २०१५- आंध्र प्रदेशात  राजमुंद्री येथे पुष्कर मेळ्यात चेंगराचेंगरीत २९ ठार

यंदाच्या पुष्करमला वेगळे महत्त्व.
गोदावरी पुष्करम हा गोदावरी नदीत स्नान करण्याचा पवित्र सोहळा दर १२ वर्षांनी साजरा होतो. पण महा पुष्करालू दर १४४ वर्षांनी येत असल्याने या वेळच्या पुष्करमला फार महत्त्व होते.
पुष्करम हा कुंभमेळय़ासारखाच असतो. देशातील इतर भागांतही लोक या धार्मिक सोहळय़ाच्या निमित्ताने पवित्र स्नान करतात.