टू-जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी खटल्यास सामोरे गेलेले माजी दूरसंचारमंत्री ए.राजा आणि द्रमुकच्या खासदार कणिमोझी यांच्यासमवेत आपण मंत्रिमंडळ रचनेसंबंधी चर्चा केली होती आणि नोव्हेंबर  २००८ मध्ये राजा यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयातही झालेल्या बैठकीस आपण टाटांच्या वतीने उपस्थित होतो, असे नीरा राडिया यांनी  विशेष न्यायालयास सांगितले. नीरा राडिया या उद्योगपतींसाठी कामे करणाऱ्या माजी लॉबिस्ट म्हणून उद्योगजगात परिचित आहेत. टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्याला एक लखोटाबंद पत्र एम. करुणानिधी यांच्या हवाली करण्यासाठी दिले होते परंतु त्या पत्राच्या तपशीलाबद्दल आपण अनभिज्ञ असल्याची माहिती राडिया यांनी न्यायालयास दिली. टाटा यांनी लिहिलेले जे पत्र उघड झाले, त्यामध्ये त्यांनी ए.राजा यांच्या नेतृत्वाची तारीफ केली होती, असे राडिया यांनी नमूद केले.