श्रीनगर येथे जमावाने पोलीस उपअधीक्षक महंमद अयुब पंडित यांना ठेचून मारल्याच्या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पंडित यांना ठेचून मारल्याच्या संदर्भात बारा आरोपींची ओळख पटली असून त्यांच्यापैकी पाच जणांना अटक करण्यात यश आले आहे, असे पोलीस महासंचालक एस.पी.वैद यांनी सांगितले.

याबाबत संयुक्त तपास पथक स्थापन करण्यात आले असून कालपर्यंत या घटनेतील दोन जणांना अटक करण्यात आली तर एकाची ओळख पटली होती. या क्रूर कृत्यात सामील असलेल्यांना मोकळे सोडणार नाही असे सांगून वैद यांनी म्हटले आहे की, महंमद अयुब पंडित यांना अत्यंत क्रूर पद्धतीने जमावाने ठार केले त्यामुळे यात सामील असणाऱ्यांची गय केली जाणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आम्ही नेमके काय झाले हे सांगू शकू. ही घटना घडली तेव्हा जामा मशिदीत हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाईझ उमर फारूक उपस्थित होते काय असे विचारले असता ते म्हणाले की, चौकशीनंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. नौहाटा भागात ही घटना २२ जून रोजी जामा मशिदीबाहेर घडली होती त्यात पंडित यांच्या अंगावरचे कपडे उतरवून जमावाने त्यांना बेदम मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ज्या हद्दीत घडली त्या पोलिस क्षेत्राचे अधीक्षक सज्जाद खालिक भट यांची बदली करण्यात आली आहे.

शस्त्रसंधीचा भंग

जम्मू : पाकिस्तानी फौजांनी शनिवारी जम्मू -काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ात स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार करत, तसेच तोफगोळ्यांचा मारा करत शस्त्रसंधीचा भंग केला. पाकिस्तानी लष्कराने लहान शस्त्रे, स्वयंचलित शस्त्रे आणि तोफा यांच्या साहाय्याने सकाळी ११.३० वाजेपासून पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. भारतीय फौजांनी या गोळीबाराचे जोरदार आणि परिणामकारक प्रत्युत्तर दिले. दुपारी २ वाजताच्या सुमारास हा गोळीबार थांबला, असे हा प्रवक्ता म्हणाला.