आयसिसच्या दहशतवाद्यांनी शनिवारी बांगलादेशातील एका हिंदू शिंप्याची हत्या केल्याच्या प्रकरणी जमात-ए-इस्लामी या मूलतत्त्ववादी संघटनेचा एक सदस्य व एक पत्रकार यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बांगलादेशच्या तंगैल जिल्ह्य़ात राहणाऱ्या निखिलचंद्र जोरदेर (५०) यांच्या घरात शिरलेल्या तीन हल्लेखोरांनी शनिवारी त्यांचा गळा चिरून त्यांना ठार मारले होते. पोलिसांनी या हत्येप्रकरणी जमात-ए-इस्लामीचा गोपालपूर जिल्हा सचिव बडसा मिया, बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता झंटू मिया तसेच पत्रकार व गोपालपूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अमिनुल इस्लाम यांना रविवारी अटक केली. जोरदेर यांच्या खुनाच्या तपासाचा भाग म्हणून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे तंगैलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहम्मद अस्लम खान यांनी सांगितले.