गडचिरोली व छत्तीसगड पोलिसांनी सीमावर्ती भागात संयुक्त अभियान राबवितांना नक्षलवाद्यांना खिंडीत गाठल्याने सॅंड्राच्या जंगलात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली बघता हे संयुक्त अभियान छेडण्यात आले आहे. आज सकाळी गडचिरोली व छत्तीसगड पोलिस संयुक्तपणे अभियान राबवित असतांना छत्तीसगड पोलिसांना नक्षलवाद्यांना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागापर्यंत नेले, तर इकडे गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांची नाकेबंदी केल्यामुळे सॅंड्राच्या जंगलात खिंडीत सापडलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल छत्तीसगड पोलिसांनीही गोळीबार केल्याने उभयतात चांगलीच चकमक उडाली.
सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. पोलिसांना प्रत्युत्तर देऊ शकत नाही, हे लक्षात येताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. यासंदर्भात गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली.