केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारच्या यशाचा लेखाजोखा मांडला. मोदी सरकारने अनेक विकासकामे केली. गेल्या ७० वर्षांत जे कुणाला जमले नाही, ते भाजप सरकारने अवघ्या तीन वर्षांत करून दाखवले, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी मांडला.  भाजप सरकारने तीन वर्षांत अनेक विकासकामे केली. तीन वर्षांत विरोधकांना भाजप सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आलेला नाही. या कालावधीत देशातील राजकारण पूर्णतः बदलून गेले आहे. तर जनतेचा आत्मविश्वास वाढला आहे, असेही शहा म्हणाले.

लोकसभा निवडणुकांदरम्यान भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आली आहेत. नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सरकारच्या ‘साथ है, विश्वास है, हो रहा विकास है’ या घोषणेचा उल्लेखही शहा यांनी केला. सरकार प्रत्येक क्षेत्रात विकास करत आहे. जातीवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे, असेही शहा यांनी यावेळी सांगितले. ‘वन रँक, वन पेन्शन’चे जवानांना दिलेले आश्वासन सरकारने पाळले आहे. अंतराळ क्षेत्रात भारताने मोठे यश प्राप्त केले आहे. सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून शत्रूला कडक संदेश दिला आहे. यावरून हे सरकार थेट निर्णय घेणारे आहे, असे त्यांनी सांगितले. काळ्या पैशांना चाप लावण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. बेनामी संपत्तीविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. आतापर्यंत १५ हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जीएसटी विधेयक हे एक सरकारचे मोठे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.