तेहरानमध्ये आग लागलेली एक उंच इमारत कोसळल्याने अग्निशमन दलाचे ३० जवान मरण पावल्याचे वृत्त इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिनीने दिले आहे.

इराणच्या राजधानीतील विस्तीर्ण बाजाराच्या उत्तरेकडे असलेल्या ‘प्लास्को’ इमारतीला लागलेल्या आगीत हे बळी गेल्याचे प्रेस टीव्हीने जाहीर केले, मात्र या माहितीचा स्रोत त्यांनी नमूद केला नाही. ही आग अनेक तास आधी लागली. तिचे कारण तत्काळ कळू शकले नाही.

१५ मजल्यांची ही इमारत १९६०च्या दशकात इराणियन ज्यूईश उद्योगपती हबीब एल्घानियन यांनी बांधली होती आणि तिचे नाव त्यांच्या मालकीच्या प्लास्टिक उत्पादक कंपनीच्या नावावर ठेवले होते. बांधली गेली त्या वेळी ही इमारत शहरातील सगळ्यात उंच इमारत होती. ‘तेहरानमधील एका गगनचुंबी इमारतीला लागलेली आग विझवण्याचा अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत असताना ती कोसळली’, असे वृत्त प्रेस टीव्ही या सरकारी माध्यमाने दिले. अनेक लोक अद्याप ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यताही त्याने व्यक्त केली. या दुर्घटनेत किमान ३८ लोक जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी ‘इरना’ या सरकारी वृत्तसंस्थेला सांगितले.