दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी तब्बल ३१ एअर कंडिशनर्स, २५ हिटर्स, १५ डेझर्ट कुलर्स, १६ एअर प्युरिफायर्स आणि १२ गिझर्स बसविण्यात आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना शीला दीक्षित ३, मोतीलाल नेहरू मार्ग या निवासस्थानी राहात होत्या. आता हाच बंगला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देण्यात आला आहे.
या बंगल्यात राहायला जाण्यापूर्वी शीला दीक्षित यांनी त्यातील इलेक्टिक वस्तू नव्याने बसवण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तब्बल १६.८१ लाख रुपये इतका खर्च आला होता. शीला दीक्षित यांच्या सांगण्यानुसारच या सर्व इलेक्ट्रिक वस्तू त्या बंगल्यात बसविण्यात आल्या होत्या, असे माहिती अधिकारात स्पष्ट झाले. सुभाष आगरवाल यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागविली होती. शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वस्तूंपैकी काही इतर सरकारी कार्यालयांमधून आणण्यात आल्या होत्या, असेही माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.