कोलंबियामध्ये एका बसला अपघातानंतर लागलेल्या आगीत ३१ लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. एक ते आठ या वयोगटातील ही मुले होती. चर्चमधील धार्मिक कार्यक्रम आटोपून ती बसने घरी परतत होती, त्यावेळी हा अपघात घडला. पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालकाला अटक केली आहे.
कोलंबियाच्या उत्तर भागातील फंडक्शन शहरात ही दुर्घटना घडली. या अपघातात एका वृद्धेसह २५ जण जखमी झाले आहेत.
बसमध्ये स्फोट
७० टक्के भाजल्यामुळे या वृद्धेची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेसह बसचालक तेथून पळून गेला. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याचे घर गाठले आणि घरावर दगडफेक केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, हा अपघात कसा घडला, याबाबत माहिती जाणून घेण्यात येत आहे. मॅगडालेना पोलिस खात्याने सांगितले की, बसचा स्फोट होऊन ही आग लागली.या अपघातामागे तांत्रिक कारण असावे, असे पोलिसांना वाटते.
पेट्रोलचा कंटेनर
चालकाने बसमध्ये पेट्रोलचा एक कंटेनर ठेवला होता, अशी माहिती बसमधील अन्य प्रवाशांनी दिली. या कंटेनरमुळेच बसला आग लागली असावी, असे पोलिसांना वाटते. हा बसचालक इंधनाचा अवैध व्यापार करत होता, अशी माहितीही पुढे आली आहे.
या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी अनेक पालक चिंताग्रस्त होऊन सर्वत्र विचारणा करीत होते.