जपानमध्ये केवळ १० किमी खोलीवर केंद्र असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, आतापर्यंत ३२ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर होती. या भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला होता. घरे, रस्ते व रेल्वेमार्ग यांचे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठे नुकसान झाले. या भूकंपात सतराव्या शतकातील कुमामोटो किल्ल्याच्या भिंती कोसळल्या आहेत. सोनी, मित्सुबिशी इलेक्ट्रिक व रेनेसास चिप मेकर या कंपन्यांच्या उत्पादनास भूकंपाने फटका बसला आहे. होंडा, टोयोटा, निसान या कंपन्यांनी मोटार उत्पादन थांबवले आहे. भूकंपामुळे लाखो टन चिखल व दगड खाली आल्याने मोठी हानी झाली आहे. अनेक इमारती कोसळल्या असून विद्यापीठाची वसतिगृहे, अपार्टमेंट कोसळून लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अनेक ठिकाणी लोक जिवंत गाडले गेले आहेत, असे कॅबिनेट सचिव योशिहिड सुगा यांनी सांगितले. पोलीस, अग्निशामक दले व नागरी संरक्षण दले मदतकार्य करीत आहेत. धरणाजवळच्या ७० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, त्यात धरण क्षेत्रातील तीनशे जणांचा समावेश आहे. शनिवारी सकाळी ७ रिश्टरच्या भूकंपाने रुग्णालयात एकदम अंधार झाल्याने रुग्ण व डॉक्टर्स यांना दुसरीकडे हलवण्यात आले. कुमामोटो नजीकच्या डोंगराळ भागात भूस्खलन झाले असून, त्यात एक हजार लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. हवाई पाहणीतून असे दिसून आले असून, त्यात पूल कोसळला असून त्या खाली काही जण अडकले आहेत. गुरुवारी याच भागात ६.२ रिश्टरचा भूकंप झाला होता, त्यानंतर आपत्कालीन दले तेथे पोहोचली होती. त्यातच जवळच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, भूकंप वैज्ञानिकांनी भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यांचा काही संबंध असल्याची शक्यता फेटाळली आहे. भूकंपाचे आणखी धक्के बसत असून हा भाग भूकंपप्रवण आहे. गुरुवारच्या भूकंपात जुन्या इमारती कोसळून नऊ जण ठार झाले होते, पण शनिवारच्या भूकंपात नव्या इमारतीही कोसळल्या असून, त्यात उटो येथील पालिका कार्यालय इमारतीचाही समावेश आहे. कुमामोटो परफेक्चरच्या प्रवक्त्या युमिका कामी यांनी सांगितले, की मृतांची संख्या ३२ झाली आहे. एक हजार लोक जखमी झाले असून, त्यातील १८४ जणांची प्रकृती गंभीर आहे. टोकाई विद्यापीठाने त्यांचे दोन विद्यार्थी मिनामी असो येथील वसतिगृह इमारत कोसळल्याने मरण पावल्याचे जाहीर केले आहे. दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने आम्हाला तीव्र दु:ख झाले आहे. अशा दुर्घटनांच्या काळात यापुढे काळजी घेतली जाईल, असे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. यातसुहिरो येथे भूकंपानंतर एका अपार्टमेंटमध्ये आग लागून एकाचा मृत्यू झाला.