शहरात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या हिंसाचारात ९२ जण मृत्युमुखी पडले आहेत. कराचीमध्ये मंगळवारी दिवसभरात झालेल्या हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये सात जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये अल्पसंख्याक शिया समुदायातील नागरिकांचा समावेश आहे.  कराची शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत असलेल्या तयारी रुग्णालयातील डॉक्टर निसार यांना मंगळवारी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मंगळवारी सकाळी एका शिया व्यक्तीच्या अन्त्यविधीच्या दरम्यान दोन गटांत झालेल्या हिंसाचारात तीन जण जखमी झाले. या वेळी दोन्ही गटांकडून ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली. संतप्त जमावाने या वेळी चोरंगी परिसरातील एका पाण्याच्या केंद्राची तोडफोड केली. तसेच दोन शववाहिन्यांनाही आगी लावल्या. हिंसक जमावाला नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तर शहरातील अन्य एका घटनेत तीन जणांची गोळी मारून हत्या करण्यात आली.