उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील ३३ मंत्री आणि विधानसभेतील ३५९ आमदारांनी अद्याप आपली संपत्ती जाहीर केलेली नाही. याप्रकरणी उत्तरप्रदेशच्या विधानसभा सचिवालयाने १० जुलै रोजी मंत्र्यांची आणि आमदारांची यादीच जाहीर केली होती.

वैयक्तीक मालमत्ता जाहीर करण्याच्या डिफॉल्टर यादीत १८ कॅबिनेट मंत्री, ११ राज्यमंत्री आणि ४ राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) यांचा यात समावेश आहे. १० जुलै रोजी याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्याचबरोबर संपत्ती जाहीर न केलेल्या आमदांमध्ये विरोधीपक्ष नेते राम गोविंद चौधरी (सपा), लालजी वर्मा (बसपा), अजयकुमार लालू (कॉंग्रेस) यांचाही समावेश आहे. विधानसभेच्या सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर पुढील तीन महिन्यांत संपत्ती आणि मालमत्तेची माहिती देणे गरजेचे असते.  आदित्यनाथ यांच्यासोबत, त्यांचे दोन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, दिनेश शर्मा आणि दोन राज्यमंत्री स्वतंत्र देव सिंह आणि मोहसीन रझा हे या दोन्ही सभागृहांचे सदस्य नसल्याने त्यांना या कायद्याचे बंधन नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांना १० मार्च रोजी शपथविधी झाल्यानंतर १५ दिवसांत आपापली स्थावर आणि अस्थावर मिळकती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. या मंत्र्यांनी त्यांची घोषणापत्रे मुख्यमंत्र्यांच्या सचिवांकडे सादर करण्यास सांगितले होते. याप्रकरणी पुन्हा आठवण करून देताना आदित्यनाथ यांनी १३ एप्रिल रोजी सर्व मंत्र्यांना अद्याप त्यांच्या संपत्तीची माहिती मिळली नसल्याचे पत्रही पाठवण्यात आले होते. पुढील तीन दिवसांत ही माहिती तुम्हा पाठवाल अशी सूचनाही त्यांनी या पत्रामध्ये केली होती.