बराक ओबामा यांची अफगाणिस्तानातून सैन्य माघारीची घोषणा
युद्धग्रस्त अफगाणिस्तानातून वर्षभरात ३४ हजार अमेरिकी सैनिकांना मायदेशी आणण्याची घोषणा करतानाच उत्तर कोरिया आणि इराणने आपल्या वादग्रस्त आण्विक कार्यक्रमासंबंधी आंतरराष्ट्रीय बंधनांचे पालन करावे, अन्यथा त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी येथे दिला.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे स्वीकारल्यानंतर देशाला उद्देशून जोशपूर्ण भाषण करताना ओबामा यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेस नवसंजीवनी देण्यासंबंधी व्यापक घोषणा केल्या. त्यामध्ये मध्यमवर्गीयांसाठी प्रोत्साहनपर घोषणांचा समावेश होता. त्यामध्ये रोजगारनिर्मिती, किमान वेतनामध्ये वाढ आदींचा समावेश असून संपूर्ण जगभरातील उत्तमोत्तम गुणवत्ता आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अमेरिकेच्या पासपोर्ट, व्हिसा धोरणात आमूलाग्र सुधारणा करण्याची घोषणाही ओबामा यांनी केली.
पुढील काळात अफगाणिस्तानातील आमच्या फौजा पाठबळाची भूमिका पार पाडतील, तर अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना तेथे आता महत्त्वपूर्ण पुढाकाराची भूमिका बजावावी लागेल, असे ओबामा यांनी नमूद केले. पुढील वर्षी अफगाणिस्तानातील ३४ हजार सैनिक मायदेशी परत येतील, असे आपण घोषित करीत आहोत, असे ओबामा यांनी सांगितले. अफगाणिस्तानात सध्या अमेरिकेचे ६६ हजार सैनिक असून ओबामा यांच्या घोषणेमुळे तेथील अमेरिकी सैन्यदल निम्म्याने कमी होईल. लिस्बन येथे २०१० मध्ये झालेल्या बैठकीत अमेरिका, अफगाणिस्तान आणि नाटोने यासंबंधी निर्णयावर मान्यता देऊन गेल्या वर्षी शिकागोमध्ये त्यावर शिक्कामोर्तब केले. २०१४ च्या अखेरीपर्यंत अफगाणिस्तान आपल्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे उचलेल, असेही तेव्हा निश्चित झाले होते.
दरम्यान, उत्तर कोरियाने बुधवारी आंतरराष्ट्रीय र्निबधांना न जुमानता तिसऱ्यांदा अणूस्फोट करून एक प्रकारचे चिथावणीखोर वर्तन केले असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा ओबामा यांनी दिला. उत्तर कोरियास अपेक्षित असलेली सुरक्षा आणि सुबत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावरील बंधनांचे पालन करूनच होईल हे त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे, असाही इशारा ओबामा यांनी दिला. तेहरानच्या अणुकार्यक्रमासंबंधात ओबामा यांनी इराणी नेत्यांनाही चार खडे बोल सुनावले. तेहरानच्या अणुकार्यक्रमावरून निर्माण झालेला पेच संपुष्टात आणण्याचा मुत्सद्देगिरीचा पर्याय अजूनही शिल्लक आहे, असे ते म्हणाले. चुकीच्या व्यक्तींच्या हाती अण्वस्त्रे पडू नयेत, यासाठी इराणला रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याच वेळी रशियानेही आपली अण्वस्त्रे कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ओबामा म्हणाले.