सीरियात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या इडलिब प्रांतात करण्यात आलेल्या हल्ल्याचा तडाखा शाळेला बसला असून त्यामध्ये बहुसंख्य मुलांसह ३५ नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे.

रशिया किंवा सीरियाच्या युद्ध विमानांनी हास गावात आणि शाळेच्या संकुलावर जवळपास सहा हल्ले चढविले, असे सीरियाच्या मानवी हक्क कार्यकर्त्यांनी सांगितले. मृतांमध्ये ११ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

नागरी संरक्षण दलाने मदतकार्य पथक ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत आहेत का, याचा शोध घेत असल्याची छायाचित्रे जारी केली आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला हे छापे टाकण्यात आले. शाळा सुटल्यावर मुले घरी जाण्याच्या तयारीत असतानाच एक रॉकेट शाळेच्या प्रवेशद्वारावर आदळले. एका मुलाचा हात तुटल्याचे चित्र काही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर टाकले. मात्र ही छायाचित्रे आणि फुटेज वैध असल्याचा निर्वाळा देण्यात आलेला नाही. गेल्या सात दिवसांत इडलिब प्रांतात करण्यात आलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ८९ नागरिक ठार झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सीरियातील लष्कर आणि त्यांचे रशियातील घटक बेछूट हल्ले करत असल्याचा आरोप उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी केला आहे. मुख्य विरोधी गटांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

 

‘तिबेट जगातील सर्वात उत्तम पर्यावरण असलेला प्रदेश’

बीजिंग : पर्यावरणाचे संरक्षणाचे प्रयत्न तिबेटमध्ये सातत्याने सुरू असल्यामुळेच तिबेट हा जगातील सर्वात स्वच्छ पर्यावरण असलेल्या प्रदेशापैकी भाग असल्याचा दावा चीनच्या अधिकाऱ्यांनी केला.

चीनच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने तिबेटमधील पर्यावरण सुरक्षा आणि बांधकाम (२००८-२०३०) यासाठी २००९ मध्ये मान्यता दिली असून, पर्यावरण सुधारण्यासाठी ही योजना आहे. तिबेट हे जगातील स्वच्छ पर्यावरण असलेल्या प्रदेशापैकी एक असल्याचे तिबेटमधील स्वायत्त प्रादेशिक विभागाचे उपाध्यक्ष वाँग हैझोऊ यांनी म्हटले आहे.

चीनमध्ये सुरू असलेल्या खाणकाम उद्योगामुळे जगाचे छप्पर म्हणून ओळख असणाऱ्या तिबेटच्या पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणावर ऱ्हास होत होता. त्यामुळे चीनवर टीका करण्यात येत होती. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपायोजना राबविल्यानंतर तिबेटमधील पर्यावरणामध्ये संतुलन निर्माण झाले. वनस्पतींची वाढ मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ओसाड झालेला भाग १,०७,१०० हेक्टरने कमी झाल्याचे यामध्ये म्हटले आहे.