मौनी अमावस्येनिमित्ताने अलाहाबादच्या त्रिवेणी संगमात महास्नान करून परतत असलेल्या भाविकांच्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३६ वर पोहोचला  आहे.  अलाहाबाद रेल्वे स्थानकात ही भीषण दुर्घटना घडली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.  रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत सोमवारी जाहीर केली.
कुंभमेळ्यातील सेक्टर १२ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला.  अलाहाबाद रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. ५ आणि ६ वर ही दुर्घटना घडली. काही प्रत्यक्षदर्शीच्या मते सायंकाळी सातच्या सुमारास फलाट क्र. ६ वरील गाडी पकडण्यासाठी अचानक लोकांची झुंबड उडाली. त्यात फलाटावरील पुलाचा कठडा तुटला आणि ही दुर्घटना घडली. मात्र बन्सल यांनी पुलाचा कठडा तुटला नसल्याचे म्हटले आहे.  नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गर्दी आवरण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे ही दुर्घटना घडली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान,  रविवारी सायंकाळच्या सुमारास कुंभमेळ्यातील सेक्टर १२ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. बन्सल हे रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱयांसह अलाहाबादला भेट देणार आहेत.
तीन कोटी भाविकांचे महास्नान
मौनी अमावास्येचा पवित्र योग साधून रविवारी दुपापर्यंत सुमारे तीन कोटींहून अधिक भाविक आणि साधूंनी अलाहाबादच्या त्रिवेणी संगमावर महास्नान केले. हिंदू पंचांगानुसार मौनी अमावास्या शनिवार दुपारपासूनच सुरू झाली होती. रविवार सकाळपर्यंत ती असल्याने या काळात अनेक भाविकांनी या पवित्र स्नानाचा लाभ घेतला. रविवारी दुपापर्यंत तर हा आकडा तीन कोटींवर गेल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. अलाहाबादमध्ये भरलेल्या महाकुंभमेळ्यासाठी भल्या पहाटे थंडीची पर्वा न करता अनेक देश-विदेशी भाविक अनेक मैलांची पायपीट करत गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर पोहोचले.
सोनियांचा महाकुंभ दौरा रद्द
अलाहाबाद : उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी रात्री सोनिया गांधी यांच्या महाकुंभ दौऱ्याबाबत आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था पुरवणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर  त्यांना हा दौरा रद्द करणे भाग पडले.  दरम्यान, कुंभमेळ्यादरम्यान अलाहाबाद रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेबद्दल सोनिया गांधी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.