मुसळधार पावसामुळे वारंवार भूस्खलन होऊन ३८ लोक मरण पावलेल्या दार्जिलिंग जिल्ह्य़ातील तीन उपविभागांमध्ये मदतकार्य सुरू असून गुरुवारीही पुन्हा एका ठिकाणी भूस्खलन झाले.
बुधवारच्या भूस्खलनामुळे जीवहानी होण्यासोबतच महामार्ग वाहून गेले, तसेच घरांचे नुकसान झाले होते. गुरुवारीदेखील दार्जिलिंगपासून ५६ किलोमीटर अंतरावरील गयाबारी येथे नव्याने भूस्खलनाची घटना घडल्यामुळे दार्जिलिंग व मिरिक दरम्यानची रस्ते वाहतूक खंडित झाली, असे प. बंगालच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. याच मार्गावर काल २१ जण ठार झाले होते.
गुरुवारी या पर्वतीय भागात पाऊस न आल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नागरी संरक्षण विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवकांनी भूस्खलनग्रस्त भागात मदतकार्य सुरू केले. सशस्त्र सीमा बल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मदत चमूंनाही या कामात सामील करून घेण्यात आले आहे. दार्जिलिंग, कॅलिंपाँग व कुर्सेआँग उपविभागांतील भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग १० व ५५ यांचे प्रचंड नुकसान झाले असून, या भागातील महत्त्वाचे रस्ते संपर्क तुटले आहेत. पर्यटकांना पठारी भागात पोहोचता यावे यासाठी रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यांच्याच निर्देशांवरून गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील चमूने भूस्खलनग्रस्त भागाचा दौरा करून मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. दरम्यान, उत्तर बंगालमधील मदत व बचावकार्यात लष्कराचे जवानही सहभागी झाले आहेत. प्रत्येकी चार चमूंचा समावेश असलेली दोन कृती दले या भागात तैनात करण्यात आल्याचे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.