दहशतवादाच्या अनेक घटनांचा सामना करावा लागत असलेल्या पाकिस्तानमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन सुरक्षारक्षक ठार झाले, तर एका मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटातही दोघांचे बळी गेले.
पाकिस्तानातील अशांत अशा बलुचिस्तानमधील एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन सुरक्षारक्षक ठार झाले. खारान जिल्ह्य़ाचे उपायुक्त खारान रझिक दिलवारी यांच्या ताफ्यावर राचिल भागात हल्ला करण्यात आला. यात दिलवारी यांच्या संरक्षणासाठी नेमलेले लेविस फोर्सचे दोन कर्मचारी ठार झाले, तर इतर दोघे जखमी झाले. उपायुक्तांना कसलीही इजा झाली नाही.
सुरक्षा दलांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन एका हल्लेखोराला ठार केले, तर दुसऱ्याला जिवंत पकडले, असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नसली, तरी या भागात बलुचिस्तान फुटीरवादी सक्रिय असून ते नेहमी सुरक्षा दलांना लक्ष्य करीत असतात.
तिकडे कराचीमध्ये अल्पसंख्याक दाऊदी बोहरा समाजाच्या एका मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान एका मोटारसायकलवर ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन किमान दोन जण ठार, तर इतर २० जण जखमी झाले. आरामबाग पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या सालेह मशिदीतून लोक प्रार्थनेनंतर बाहेर येत असताना प्रवेशद्वारावरच हा बॉम्ब फुटला. कराचीतील बोहरा समाजाच्या मशिदीवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. बॉम्बस्फोटामुळे या वर्दळीच्या व्यावसायिक भागात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले.