अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर व्हिसाबाबतच्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले होते. यामुळे नोकऱ्यांसाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय नागरिकांना काही प्रमाणात धक्का बसला होता. मात्र नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार मार्च आणि एप्रिलमध्ये भारतीयांना अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या तात्पुरता व्हिसामध्ये २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाऱ्या व्हिसामध्ये ४० टक्क्यांनी घट झाल्याचे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे भारतीयांना अमेरिकेची व्दारे बंद होतील की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ही आकडेवारी पाहून भारतीयांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिकांसाठी ही निराशेची बाब आहे.

ट्रम्प प्रशासनाकडून एप्रिल २०१७ मध्ये ३९२५ पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यात आला असून, मार्च महिन्यात ३९७३ जणांना व्हिसा देण्यात आला आहे. मागील वर्षी ओबामा प्रशासनाकडून एका महिन्यांमध्ये सरासरी ६५५३ पाकिस्तानी नागरीकांना व्हिसा देण्यात आला होता. त्यामुळे या संख्येत साधारणतः ४० टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे.

याशिवाय समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०१७ मध्ये ८७०४९ तर मार्चमध्ये ९७९२५ भारतीय नागरिकांना अमेरिकी प्रशासनाने व्हिसा दिले होते. तर मागील वर्षी एका महिन्यात साधारण ७२०८२ तात्पुरते व्हिसा देण्यात आले होते.

अशाप्रकारे कमी नागरिकांना व्हिसा मिळणारा पाकिस्तान हा एकच मुस्लिमबहुल देश नाही तर अशा जवळपास ५० देशांतील नागरिकांना व्हिसा देण्याचे प्रमाण जवळपास २० टक्क्यांनी कमी केल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले. जानेवारीमध्ये ट्रम्प यांनी एक अध्यादेश जारी केला होता. ज्यामध्ये मुस्लिमबहुल असणाऱ्या इराक, सिरिया, सुदान, इराण, सोमालिया, लिबिया आणि येमेन या सात देशांतील नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात अमेरिकेत येण्यास मज्जाव करण्यात आला होता.