अरब आघाडीच्या लढाऊ विमानांनी लागोपाठ पाचव्या रात्री येमेनमधील शिया बंडखोरांवर हल्ले केले असून इतरत्र हिंसाचार सुरू आहे. रात्री नऊ वाजता लढाऊ विमाने सना शहरावर घिरटय़ा घालू लागली ती पहाटेपर्यंत बॉम्बफेक करीत होती. दरम्यान स्थलांतरविषयक एका जागतिक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ईशान्येकडील भागात ४५ जण ठार झाले आहेत. अध्यक्ष अबेड्राबो मनसूर हादी यांच्या विरोधात नांगी टाकत नाहीत तोपर्यंत हल्ले सुरूच ठेवण्याचा निर्धार सौदी आघाडीने केला आहे. हादी हे येमेनमधून पळून गेले असून ते रियाधमध्ये गेले व नंतर अरब बैठकीसाठी इजिप्तला गेले.
इराणचा पाठिंबा असलेल्या हुथी बंडखोरांनी व सैनिकांच्या छावण्यांवर व राजप्रासादावर हल्ले करण्यात आले. दक्षिण सनामध्येही जोरदार गल्ले करण्यात आले, हुथींना माजी अध्यक्ष अली अब्दुल्ला सलेह यांच्या लष्करी सैनिकांचा पाठिंबा आहे. ते २०१२ मध्ये रक्तरंजित निदर्शनानंतर पायउतार झाले होते. सनाच्या पूर्वेला १४० किलोमीटर अंतरावर रडार यंत्रणा व जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचे साठे आहेत तेथेही हल्ले करण्यात आले.
पश्चिम येमेनमध्ये विमानविरोधी संरक्षक फळीवर होदिदा येथे हल्ले करण्यात आले. दक्षिण भागात अनेक सैनिकी छावण्यांवर बॉम्बफेक करण्यात आली आहे.
भारतीयांच्या सुटकेसाठी विमान
संघर्षग्रस्त येमेनमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने विमाने पाठवली असून सरकारने तेथे अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दिल्ली येथून १८० प्रवासी क्षमता असलेले विमान  सनाकडे मस्कतमार्गे रवाना झाले. कोची येथून दोन जहाजेही रवाना झाली आहेत.
शनिवारी ८० भारतीय सनाहून दिजबौतीला गेले आहेत, तेथून त्यांना भारतात आणण्यासाठी दूतावास प्रयत्न करीत आहे. दरम्यान, येमेनमधील स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.