पाकिस्तानी सागरी सुरक्षा संस्थेने गुजरात किनाऱ्यापासून काही अंतरावरील जखाऊ बंदराजवळ ४८ भारतीय मासेमारांना पकडून त्यांच्या आठ बोटी जप्त केल्याची माहिती नॅशनल फिशवर्कर्स फोरम या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानच्या ‘मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सी’च्या (एमएसए) रक्षकांनी अनेक वेळा हवेत गोळीबार केला आणि भारताच्या सागरी हद्दीतून त्यांना पकडून कराचीला घेऊन गेले, असा दावा संघटनेने केला. परत आलेल्या काही इतर मासेमारांकडून आम्हाला या घटनेची माहिती मिळाली, असे संघटनेचे सचिव मनीष लोढारी म्हणाले.
हे सर्व मासेमार आणि बोटी पोरबंदर आणि वेरावळ येथील होत्या. पाकिस्तानी संस्थेने त्यांना कराचीला नेऊन तुरुंगात डांबले, असे लोढारी म्हणाले.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात एमएसएने याच भागात आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीनजीक ५८ भारतीय मासेमारांना पकडून त्यांच्याकडील ११ बोटी जप्त केल्या होत्या. भारतीय तटरक्षक दलाने ३१ डिसेंबरच्या रात्री पोरबंदर किनाऱ्याजवळ पाकिस्तानच्या एका मासेमारी बोटीला अडवल्यानंतर त्यावरील लोकांनी बोटीचा स्फोट घडवून आणला होता. त्या पाश्र्वभूमीवर ही घटना घडली आहे.