सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचाही सहभाग
पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानासह आयएसआयच्या हस्तकाला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला त्यांच्या कारवायांचा सुगावा लागला होता. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कोलकात्यापर्यंत पाळेमुळे पसरलेल्या हेरगिरी रॅकेटचा उलगडा झाला आहे.
हेड कॉन्स्टेबल अब्दुल रशीद असे सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचे नाव असून कफैतुल्ला खान ऊर्फ मास्टर राजा असे आयएसआय एजंटचे नाव आहे. या दोघांना देशाच्या सुरक्षेला धोकादायक ठरू शकेल अशा संवेदनशील माहितीची देवाण-घेवाण करताना जम्मू रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले. रशीद सीमा सुरक्षा दलाच्या हेरगिरी विभागात जम्मू जिल्ह्य़ात तैनात होता, तर खान पाकिस्तानी हेर संघटना आयएसआयचा हस्तक आहे. तो गुरुवारी जम्मूहून भोपाळला निघाला होता. तेव्हा त्याला पकडण्यात आले. रशीद खान याला कोणत्या भागात कोणती सुरक्षा दले तैनात आहेत आणि हवाई दलाच्या हालचालींविषयी माहिती पुरवत होता. ते ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप, व्हायबर आदींच्या माध्यमातून संपर्क करत होते.
चौकशीत खानने माहिती दिली की, तो राजौरी जिल्ह्य़ातील मजानकोट येथे एका शाळेत वाचनालयात साहाय्यक म्हणून काम करत होता. त्याने २०१३ साली पाकिस्तानला भेट दिली होती आणि त्यावेळी तो आयएसआयच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याने भारतीय सुरक्षा दलांसंबंधी माहिती देण्याचे कबूल केले. त्याच्या बदल्यात त्याला पैसे मिळत होते. त्याने सुरक्षा दलांतील अनेकांशी संबंध प्रस्थापित केले होते. पैशाचे आमिष दाखवून तो त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवत होता. त्याच्या माहितीवरून कोलकाता पोलिसांच्या विशेष पथकाने कोलकात्यात इर्शाद अन्सारी नावाच्या कामगार कंत्राटदार, त्याचा मुलगा अश्फाक अन्सारी आणि नातेवाईक मोहम्मद जहांगीर यांना अटक केली.