गूगलच्या सुमारे ५० लाख खातेधारकांचे यूजरनेम आणि पासवर्ड रशियन हॅकर्सनी हॅक केले असून, एका वेबसाईटवर हे यूजरनेम आणि पासवर्ड प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सायबरविश्वातील सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या गूगलच्या खातेधारकांचेच यूजरनेम आणि पासवर्ड हॅक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, गूगलने आपल्या काही खातेधारकांचे यूजरनेम आणि पासवर्ड हॅक झाल्याचे अधिकृत ब्लॉगवर मान्य केले आहे. गूगलचे पासवर्ड हॅक केल्यामुळे संबंधित खातेधारकांच्या जीमेल, यूट्यूब, हॅंगआऊट्स, ड्राईव्ह आणि मॅप्स याही सुविधा हॅकर्सच्या ताब्यात गेल्या आहेत. हॅक केलेल्यांपैकी ६० टक्के खातेधारकांचे यूजरनेम आणि पासवर्ड अद्याप तसेच आहेत. त्यात कोणताही बदल केलेला नाही, असे हॅकर्सने म्हटले आहे. मात्र, गूगलने दिलेल्या माहितीनुसार हॅक झालेल्या खातेधारकांपैकी दोन टक्क्यांपेक्षा कमी खातेधारकांचे यूजरनेम आणि पासवर्ड हॅकर्सनी बरोबर लिहिली आहेत. त्याचबरोबर गूगलच्या हॅकिंगविरोधातील यंत्रणेमुळे हॅकर्सना या खातेधारकांच्या खात्यांमध्ये घुसखोरी करता आलेली नाही. ही खाती ब्लॉक केली गेली आहेत. संबंधित खातेधारकांना आम्ही पासवर्ड बदलण्याची विनंती केली असल्याचे गूगलने स्पष्ट केले.