अफगाणिस्तानची राजधानी काबुल पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. शनिवारी देह मझांग चौकात हजारा समाजाकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आत्मघातकी हल्ला झाला. अफगाणिस्तान सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यातील मृतांचा आकडा ६१ वर पोहचला आहे. तर २०५ हून अधिक जण जखमी झाल्याचे समजते आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तीन आत्मघातक्यांनी आंदोलन सुरू असताना हल्ला केला. यातल्या एकाने स्फोटाने स्वत:ला उडवून दिले.  तर एक जण पोलीसांच्या हल्ल्यात ठार झाल्याचे समजते आहे. या हल्ल्यात सरकारी आकडेवारीनुसार २०५ जण जखमी झाल्याचे समजते आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अफणिस्तानमधल्या हजारा समुद्याच्या लोकांनी आपल्या मागण्यांसाठी शनिवारी राजधानीत मोर्चा काढला होता. या आंदोलनात हजारो संख्येने या समुद्याचे लोक सहभागी झाले होते.  त्यावेळी हा आत्मघातकी हल्ला झाल्याचे समजते.

हजारा समाजातील लोकांनी वीज पुरवठा करण्यात येणारी वाहिनी त्यांच्या भागातून हटवण्यात आली होती म्हणून आंदोलन केले होते. हजारा समाजाच्या आंदोलनामुळे शुक्रवारपासूनच राजधानीकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते अशी माहिती समजत आहे. तसेच या आंदोलनामुळे काबुलमधील दुकाने आधीच बंद करण्यात आली होती. अफगाणिस्तानमधील  अत्यंत गरीब आणि मागासलेला असा हा हजारा समाज आहे. तसेच या समाजाविषयी अफगाणिस्तानमध्ये पूर्वग्रह देखील आहेत. तालिबान्यांनी देखील या समाजाला लक्ष्य करत अनेकांना ठार केले होते.

अफगाणिस्तान सरकार आपल्यासोबत भेदभाव करतो असा आरोप या समाजाचा आहेत. गरीब आणि मागासलेला असल्याने अनेक गोष्टींपासून वंचित रहावे लागते असे या समाजाचे म्हणणे आहे. अफगाणिस्तान समाजात हजारा समाजाबद्दल असलेल्या पूर्वग्रहांमुळेच या आंदोलनाला लक्ष्य केले गेले असावे असाही अंदाज  बांधला जातोय.  या आंदोलनात सहभागी होणा-या आंदोलनकर्त्यांची संख्या पाहता मृतांचा  आकडा वाढण्याची शक्यता अधिक आहे.