देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेने ५०० हून अधिक बळी घेतले असून पाऱ्याची पातळी वाढून राजधानीत सोमवारी सर्वाधिक, ४५.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आतापर्यंत ५१७ जण मृत्युमुखी पडले असून ओदिशात चार, तर राजस्थानात दोन जण उष्माघाताने मरण पावल्याचे वृत्त आहे.

राजधानीत सोमवारी ४५.५ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. यंदाच्या हंगामात हा सर्वाधिक तापमानाचा उच्चांक आहे. हे तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी अधिक आहे. पालम येथे तर तापमानाची नोंद ४६.४ अंश सेल्सियस एवढी झाली. दिल्लीचे किमान तापमान २८ अंश सेल्सियस-नेहमीपेक्षा अधिक होते. हवेतील सापेक्ष आद्र्रता १९ ते ६२ टक्क्यांदरम्यान होती, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेलंगणात उष्णतेच्या लाटेने १५ मेपासून ते आतापर्यंत २१५ जणांचे बळी घेतले असून आंध्र प्रदेशात हाच आकडा ३०२ च्या घरात गेला आहे. या दोन्ही राज्यांतील तापमान वाढलेलेच असून गेल्या २४ तासांत ते ४५ अंश सेल्सियसच्या घरात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, राजस्थानात जैसलमेर येथे ४५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून कोटा येथील नोंद ४५.६ अंश सेल्सियस एवढी होती. श्रीगंगानगर, चुरू, बिकानेर, पिलानी आणि जयपूर येथे कमाल तापमान अनुक्रमे ४५.२, ४४.८ व ४४.५ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले.