तमिळनाडूमधील तिरुपुर जिल्ह्यात शनिवारी सकाळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणीदरम्यान ५७० कोटी रुपयांनी भरलेले तीन कंटेनर जप्त करण्यात आले आहेत.तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्यभरात तपासणी करण्यात येत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी आज सकाळी तिरुपूर जिल्ह्यातील पेरुमन्नालूर-कुन्नाठूर बायपासवर चेंगापल्ली येथे हे पैशाने भरलेले तीन कंटेनर जप्त करण्यात आले आहेत.
जप्त करण्यात आलेली रोकड ही स्टेट बँक ऑफ इंडियाची असून स्टेट बँकेच्या कोइम्बतूर शाखेतून ती विशाखापट्टणम येथील शाखेत नेली जात होती, असे कंटेनर चालकांचे म्हणणे आहे. मात्र, तसे कोणतेही कागदोपत्री पुरावे त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे निवडणूक आयोगाने हे कंटेनर ताब्यात घेतले.
तामिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशाने भरलेल्या या तीन ट्रकसोबत साध्या वेशात आंध्र प्रदेश पोलीस आणि स्टेट बँकेचे अधिकारीही होते. भरारी पथकाने या ट्रक अडविण्याचा प्रयत्न केल्यावर ट्रक डायव्हर्सनी हे ट्रक जोरात पळवले. त्यामुळे भरारी पथकाचा संशय बळावला आणि मग या ट्रकचा पाठलाग करून त्या ताब्यात घेण्यात आले. एवढी मोठी रक्कम वाहून नेण्यापूर्वी दोन्ही राज्यांच्या पोलिसांना अधिकृतपणे का कळवण्यात आले नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांचा तपास करण्यासाठी तिरूप्पूर जिल्हा प्रशासनाने भारतीय रिझर्व्ह बँक, आयकर अधिकारी, दोन्ही राज्यांचे पोलीस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती बनवली आहे.