राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २०२५ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून संघाने सध्या अनेक महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. यामधील ‘पुराणातंर्गत इतिहास’ या उपक्रमाच्या माध्यमातून पुढील दहा वर्षांत पौराणिक माहितीच्या आधारे संपूर्ण भारतीय इतिहास नव्याने लिहिण्याचा संघाचा संकल्प आहे. या योजनेतंर्गत देशातील ६७० जिल्हे आणि तब्बल ६०० समुहांचा इतिहास खुलासेवार मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय इतिहास संकलन आणि भारतीय पुराण अध्ययन संस्था या दोन संस्थांनी या कामात पुढाकार घेतला आहे. येत्या २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान गुजरातमधील पालमपूर येथे यासंदर्भातील एक कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला अखिल भारतीय इतिहास संकलन संस्थेशी संबंधित देशाच्या विविध विद्यापीठांतील इतिहासाचे १०० प्राध्यापक हजेरी लावणार आहेत. या कामासाठी दिल्लीतील संघाच्या मुख्यालयातील आवारात भारतीय पुराण अध्ययन संस्थानच्या कार्यालयाची स्थापनादेखील करण्यात आली आहे. पुराणग्रंथ हे भारतीय इतिहासाचा मुख्य दुवा असून, लोकांनी भारतीय इतिहासाकडे योग्य दृष्टीने पाहावे, या उद्देशाने संघाकडून ‘पुराणातंर्गत इतिहास’ हा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती संघाचे प्रचारक बालमुकूंद पांडे यांनी दिली आहे.