डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमच्या डेऱ्यातील एकेक रहस्ये आता उलगडत आहेत. सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाच्या परिसरात जमिनीखाली ६०० सांगाडे असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. मुख्यालयातील दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष तपास पथकाला ही माहिती दिली.

हरयाणातील सिरसामध्ये राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. मुख्यालयाच्या परिसरात ६०० सांगाडे असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून मिळाली आहे. डेरा सच्चा सौदाची अध्यक्ष विपश्यना इन्सा आणि उपाध्यक्ष डॉ. पी. आर. नैन या दोघांनी हरयाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाला ही माहिती दिली. मृत्यूनंतर डेरा परिसरात अस्थी पुरल्यास मोक्ष मिळतो, अशी राम रहिमच्या अनुयायांची श्रद्धा आहे. त्यामुळे डेरा परिसरातील जमिनीखाली ६०० लोकांचे सांगाडे आणि अस्थी आहेत, असे नैन याने पोलिसांना सांगितले. मात्र राम रहिमच्या अनुयायांची खरीच अशी काही श्रद्धा होती की यामधील काहींचे खून करुन त्यांचे मृतदेह पुरण्यात आले, याची चौकशी पोलीस करत आहेत.

राम रहिमच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांची हत्या करुन त्यांचे मृतदेह पुरले जायचे, असे आरोप डेऱ्याच्या माजी अनुयायांनी केले आहेत. मृतदेह पुरल्यानंतर त्याजागी झाड लावले जायचे. त्याबद्दल कुणाला समजू नये याची पुरेपूर काळजी घेतली जात होती. हे रहस्य कधीही जगासमोर येऊ नये यासाठी या भागात खोदकाम न करण्याचे आणि झाड न कापण्याचे आदेश देण्यात आले होते, असे आरोप राम रहिमच्या काही माजी अनुयायांनी या आधी केले आहेत.

विशेष तपास पथकाने सोमवारी विपश्यना इन्साची सुमारे सव्वातीन तास चौकशी केली. यावेळी डीएसपी कुलदीप बैनीवाल यांनी विपश्यनाला १०० हून अधिक प्रश्न विचारले. मात्र तिने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळेच तिची पुन्हा चौकशी केली जात आहे. विपश्यना आणि पी. आर. नैनने दिलेल्या उत्तरांमध्ये पोलिसांना विरोधाभास आढळून आला आहे. या दोघांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.