दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिलांची सुरक्षितता हा मुद्दा ऐरणीवर आला असला तरी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात मात्र तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी एकूण फक्त १९ महिलांनाच उमेदवारी दिली आहे.  दिल्लीतील महिला मतदारांच्या संख्येच्या अगदी नगण्य प्रमाणात तिन्ही प्रमुख पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे.
भाजप, आप आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांच्या एकूण १९ महिला उमेदवार विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या महिला उमेदवारांची संख्या सर्वाधिक असून त्यात मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचाही समावेश आहे.
भाजपने किरण बेदी यांच्याव्यतिरिक्त पटेल नगर विधानसभेतून माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ, दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा रेखा गुप्ता यांना शालिमार बाग येथून उमेदवारी दिली आहे, तर सर्वाधिक चर्चा केल्या जाणाऱ्या नवी दिल्ली मतदारसंघातून नूपुर शर्मा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. एकूण आठ महिलांना भाजपने तिकीट दिले असून त्यामध्ये त्रिलोकपुरी येथून किरण वैद्य, तिमारपूरमधून रजनी अब्बी, मालवीय नगर येथून होमिओपथी डॉक्टर नंदिनी शर्मा आणि मेहरौली येथून दक्षिण दिल्लीच्या माजी महापौर सरिता चौधरी यांचा समावेश आहे.
भाजपच्या खालोखाल आम आदमी पार्टीने सहा महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्या आहेत. राखी बिर्ला, बंदना कुमारी, सरिता सिंग, अलका लांबा, प्रमिला टोकस आणि भावना गौर यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या महिला उमेदवारांची संख्या केवळ पाच आहे.
प्रतिष्ठेच्या नवी दिल्ली मतदारसंघातून किरण वालिया या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवीत असून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी या ग्रेटर कैलाश मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.   निवडणूक रिंगणातील एकूण ६७३ उमेदवारांपैकी केवळ ६६ महिला उमेदवार आहेत.