गुजरात विधानसभेच्या  ८७ जागांसाठी पहिल्या टप्प्यात गुरुवारी ६७ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त अशोक माणेक यांनी दिली. सौराष्ट्राच्या सात जिल्ह्य़ांतील ४८ मतदारसंघांत तर दक्षिण गुजरातमधील सात जिल्ह्यांच्या ३५ जागांवर तसेच अहमदाबाद शहरातील चार जागांवरही गुरुवारी मतदान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजपला जय श्रीराम करून पक्षत्याग करणारे केशुभाई पटेल, भाजपचे आर.सी.फालदू तसेच काँग्रेसचे अर्जुन मोधवाडिया यांच्यासारख्या दिग्गजांचे भवितव्य ठरविणाऱ्या मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. मतदानाच्या कालावधीत सुरत येथे तणावाच्या काही घटना घडल्या. लिंबायत येथे भाजपच्या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये वाहने उभी करण्याच्या मुद्दय़ावरून तणाव झाला. लिंबायत येथेच संगीता पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष असून श्रेष्ठींच्या या निर्णयाच्या निषेधार्थ पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी आपले राजीनामेही सादर केले आहेत.
काही मतदारसंघातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या तर काही मतदारांनी आपली नावे मतदारयाद्यांमध्ये नसल्याच्याही तक्रारी केल्या.
विकासाची अप्रत्यक्ष कबुली!
गुजरातमधील सामान्य माणूस काबाडकष्ट करीत आहे परंतु आपला खासगी कार्यक्रम राबविण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी त्याचे श्रेय उपटत आहेत, या शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी पालनपूर येथील प्रचारसभेत टीकास्र सोडले.
तुम्ही येथे रात्रंदिवस कष्ट करीत आहात परंतु त्याचे श्रेय मात्र गुजरातमधील एकच माणूस लाटत आहे, अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.