प्रशांत महासागरावरील अलास्का येथील समुद्रकिनारपट्टीला शनिवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता ७.७ इतकी नोंदवली गेली. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने या संबंधात परिपत्रक जारी केले असून त्यानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू अलास्काच्या पश्चिमेस १०२ किलोमीटर अंतरावर क्रेग येथे होता. या तीव्र भूकंपाच्या धक्क्य़ामुळे झालेल्या हानीचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.
अलास्का परिसरात दक्षतेचे आदेश देण्यात आले असले तरी सध्या तरी त्सुनामीचा कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही, असे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.ऑक्टोबर २०१२ मध्ये क्रेगच्या दक्षिणेस असलेल्या कॅनडातील क्वीन शरलोट बेटाला याच क्षमतेचा धक्का बसला होता. त्यावेळी त्सुनामीचा सौम्य स्वरूपाचा फटका अमेरिकेला बसला होता, मात्र त्याने तितकीशी हानी झाली नाही.