केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या असलेला महागाई भत्त्याचा आकडा १०० टक्क्यांवरून १०७ टक्क्यांवर नेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यास त्याचा फायदा सुमारे तीस लाख कर्मचाऱ्यांना तसेच ५० लाखांहून अधिक निवृत्तिवेतनधारकांना मिळू शकेल. १ जुलै २०१३ ते ३० जून २०१४ या कालावधीतील महागाईतील सरासरी वाढ ७.२५ टक्क असून त्यामुळेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सात टक्क्यांची वाढ देण्याचा निर्णय घेण्याचा सरकारचा मनोदय आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगतिले. वित्त मंत्रालयातर्फे मंत्रिमंडळासमोर या
वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच ठेवण्यात येईल.