काश्मीर खोऱ्यात आलेल्या पुराचा फटका लष्कराचे तळ, बंकर आणि ठाणी अशा ७० छावण्यांना बसला असला तरी अत्यंत संवेदनक्षम सीमेवरील भागांत राहिलेल्या त्रुटी भरून काढण्यासाठी सुरक्षा दलाने पुरात नुकसान झालेल्या आणि वाहून गेलेल्या छावण्या अन्यत्र पुन्हा उभारल्या आहेत.
या पुरात काही छावण्या अंशत: बुडाल्या तर काही संपूर्णपणे बुडाल्या आहेत, परंतु सुरक्षा रक्षकांनी सर्व जवानांना वाचविले आहे. दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी काश्मीर खोऱ्यात उभारण्यात आलेल्या ३०-४० छावण्या, ठाणी आणि बंकरचे पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे, असे लष्कराच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ३० छावण्या, बंकरचे अतोनात नुकसान झाले आहे, तर १०-१५ बंकर पुरात वाहून गेले आहेत. मात्र आम्ही तातडीने पावले उचलून या सुविधा अन्यत्र उभारल्या आहेत, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणतीही त्रुटी ठेवण्यात आलेली नाही, असे अधिकारी म्हणाला.