विधानसभा निवडणुकांसाठी गुजरातमध्ये १३ व १७ डिसेंबर रोजी झालेले मतदान हे आतापर्यंतचे विक्रमी मतदान ठरले आहे. १९९५च्या निवडणुकीत ६४.७० टक्के मतदानाची नोंद गुजरातमध्ये झाली होती. यंदा हा आकडा ७१.३० एवढा जास्त आहे. विशेष म्हणजे राजकीय विश्लेषकांच्या मते जास्त प्रमाणात मतदान झाल्यास सत्तापालटाचा संभव असतो. मात्र या निवडणुकीत सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असे आराखडे तज्ज्ञांनी मांडले आहेत.
गुजराज विधानसभेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात १३ डिसेंबर रोजी ७०.७५ एवढे मतदान झाले. मात्र सोमवारी झालेल्या दुसऱया टप्प्यात हे प्रमाण ७१.८५ टक्के एवढे होते, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अशोक माणेक यांनी दिली. निवडणूक आयोग आणि प्रसारमाध्यमे यांनी मतदारांच्या मतदानाच्या हक्काबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी घेतलेल्या कष्टांना आलेले हे फळ असल्याचे माणेक यांनी स्पष्ट केले.
गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या २००२च्या निवडणुकीत ६१.५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत भाजपला सत्तेच्या सोपानावर चढवले होते. त्या वेळी हिंदुत्त्व या घटकाने खूप मोठे सहाय्य केल्याचे बोलले जात होते. डिसेंबर २००७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५९.७७ टक्के मतदान होऊन पुन्हा एकदा भाजपला सत्ता कायम राखण्यात यश आले. या वेळी भाजपने १८२ पैकी ११७ जागा जिंकल्या होत्या.
मात्र यंदा तब्बल १० टक्क्यांनी मतदान जास्त झाल्याने राजकीय पक्षही गोंधळात पडले आहेत. राजकीय तज्ज्ञांनी मोदींच्या विजयाचे आराखडे बांधले असले, तरी या निवडणुकीत कोणाची सरशी होणार, हे सांगणे कठिण होऊन बसले आहे.